सोलापूर : शाळेतील सिलिंगचा गिलावा कोसळला
‘झोक्यामुळे’ दुर्घटना झाल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.) : अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेतील सिलिंगचा गिलावा कोसळल्याच्या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र या घटनेबाबत जिल्ह
ZP CEO


‘झोक्यामुळे’ दुर्घटना झाल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.) : अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेतील सिलिंगचा गिलावा कोसळल्याच्या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र या घटनेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिलेले स्पष्टीकरण आता चर्चेचा विषय ठरले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या म्हणण्यानुसार, सिलिंग फॅनच्या हुकाला साडीचा झोका बांधण्यात आला होता आणि त्या झोक्यामुळे सिलिंगचा गिलावा कोसळला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला हा दावा धक्कादायक असल्याची चर्चा असून, या स्पष्टीकरणावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुळात शाळेच्या इमारतीचे बांधकाम किती दर्जेदार होते, सिलिंगमध्ये काही दोष होता का, तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेवर झाली होती का, हे तपासणे आवश्यक आहे. शाळेच्या बांधकामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली होती का, हाही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित या घटनेनंतर निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित मक्तेदारावर कारवाई होणार का? बांधकाम विभागातील नियंत्रण अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित केली जाणार का? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

गिलावा कोसळण्यामागे नेमके कारण काय होते, याची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज आहे. केवळ ‘झोका बांधल्यामुळे गिलावा पडला’ असे कारण देण्याऐवजी शाळेच्या इमारतीची बांधकाम गुणवत्ता, संरचनात्मक सुरक्षितता आणि देखभाल-दुरुस्तीची स्थिती यांची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित गंभीर घटना असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची सुरक्षितता तपासावी, अशी मागणी होत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande