
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा सॉफ्ट कॉर्नरजवळ भरधाव आयसर ट्रकने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने बैलगाडीवरील तीन शेतमजूर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैलही जखमी झाले आहेत. त्यापैकी एका बैलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
हा अपघात गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४० वाजताच्या सुमारास घडला. शेतातून शेतमजुरांना घेऊन बैलगाडी तिवसाकडे येत असताना नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू आयसर ट्रकने बैलगाडीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बैलगाडीचे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला एमएच १६ डीपी ०३०१ क्रमांकाचा टाटा आयसर ट्रक ताब्यात घेतला आहे.जखमींना तातडीने तिवसा शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.या अपघातात किसन हिरवाळे (वय ५०, रा. तिवसा) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर संकेत भोंबे (वय २५, रा. तिवसा) आणि अंकुश ठाकरे (वय ३२, रा. तिवसा) हे जखमी झाले आहेत.दरम्यान, अपघातात बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैलही जखमी झाले असून एका बैलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तिवसा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी