
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
शहरातील विविध कॉलनी परिसरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्यात यावे, तसेच त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील हनुमाननगर, प्रकाश कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी तसेच नंद स्मित कॉलनी परिसरातील सिमेंट रस्त्यावर मोठ्या संख्येने जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरे अचानक वाहनांसमोर आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉलनी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळपासून रात्रीपर्यंत मोकाट जनावरांचे कळप दिसून येतात.
रस्त्याच्या मधोमध किंवा वळणाच्या ठिकाणी जनावरे बसलेली असल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहने नियंत्रित करणे कठीण होत आहे. एखाद्या वाहनाची जनावरासोबत धडक झाल्यास चालकाचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. धडकेनंतर जनावर थेट वाहनावर आदळल्यास वाहनातील प्रवाशांनाही गंभीर दुखापत होऊ शकते. रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे अपघात घडल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपरिषदेने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. केवळ जनावरांना पकडण्याची कारवाई करून थांबण्याऐवजी त्यांची योग्य व्यवस्था करणे, संबंधित पशुमालकांवर जबाबदारी निश्चित करणे आणि पुन्हा जनावरे रस्त्यावर येणार नाहीत, यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
अमरावती-वरुड मार्गावरही धोका
दरम्यान, अमरावती-वरुड मार्गावरही मोकाट जनावरे रस्त्यावर बसत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत रस्त्यावर अचानक जनावरे आल्यास दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहनाचा वेग नियंत्रित करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे या मार्गावरही अपघाताचा धोका वाढला आहे.
मोठ्या दुर्घटनेची वाट पाहू नका
मोकाट जनावरांचा प्रश्न हा केवळ वाहतुकीच्या अडथळ्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रशासनाने प्रभावी कारवाई करणे गरजेचे आहे. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील कॉलनी परिसर तसेच अमरावती-वरुड मार्गाची पाहणी करून रस्त्यावर फिरणाऱ्या व बसणाऱ्या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी