
रत्नागिरी, 13 ऑगस्ट (हिं.स.) । पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत सौ. नीलिमा लिमये यांचे प्रवचन होणार आहे.
वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात सायंकाळी पावणेसहा वाजता प्रवचन सुरू होईल. सौ. नीलिमा लिमये यांचे ‘अंतरी असावा अखंड उल्हास’ प्रवचन व श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन असा कार्यक्रम यावेळी होणार आहे. लिमये पुणे येथील असून त्यांनी बी.कॉम असून फायनान्स या विषयात एमबीए केले आहे. गेली २५ वर्षे आयटी क्षेत्रात फायनान्स डिपार्टमेंटमध्ये त्या नोकरी करीत आहेत. त्यांना प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख (मुरगूड) यांचा अनुग्रह मिळाला आहे. तेव्हापासून दासबोध, भगवद्गीता या ग्रंथांचा अभ्यास सुरू आहे. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त व सहसचिव आहेत. शिवथरघळ येथे युवा तसेच प्रापंचिक शिबिरात सत्रे घेतात.त्यांच्या प्रवचनाला आणि श्रीक्षेत्र पावस षण्मासिकाच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी