शेलू फाटा परिसरात देशभक्तीचा उत्साह; झोपड्यांवर फडकतोय तिरंगा
यवतमाळ, १३ ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील शेलू फाटा परिसरात झोपड्या करून वास्तव्यास असलेल्या मजूर कुटुंबांमध्ये यंदाही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. भाजप कार्यकर्त्या डॉ. जयश्री गुट्टे यांच्या पुढाकारातून मागील तीन वर्षांपासून या परिसरातील प
गावाबाहेरील झोपड्यांवर फडकतोय तिरंगा ध्वज:डॉ. जयश्री गुट्टेंच्या पुढाकारातून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी जनजागृती


यवतमाळ, १३ ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील शेलू फाटा परिसरात झोपड्या करून वास्तव्यास असलेल्या मजूर कुटुंबांमध्ये यंदाही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. भाजप कार्यकर्त्या डॉ. जयश्री गुट्टे यांच्या पुढाकारातून मागील तीन वर्षांपासून या परिसरातील प्रत्येक झोपडीवर अभिमानाने तिरंगा फडकविण्यात येत आहे.

आर्थिक हलाखीमुळे तसेच शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मजूर कुटुंबांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केवळ ध्वज फडकविण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता लहान मुलांसह अशिक्षित पालकांनाही राष्ट्रध्वजाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि ध्वजाचा सन्मान कसा राखावा, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

तिरंगा ठरतोय राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक

तिरंगा हा देशाच्या अभिमानाचे, एकतेचे आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असल्याची जाणीव या कुटुंबांमध्ये

निर्माण केली जात आहे. त्यामुळे शेलू फाटा परिसरातील बालकांसह नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ होत असून, राष्ट्रीय सणांबद्दलही उत्साह वाढला आहे.

शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला स्थानिक पातळीवर मिळालेला हा सकारात्मक लोकसहभाग सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे. आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाच्या मर्यादा असतानाही राष्ट्रीय सणाचा उत्साह आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम विशेष ठरत आहे.

झोपडपट्टीत जाऊन जनजागृती

शेलू फाटा परिसरात मोठ्या संख्येने मजूर कुटुंबे वास्तव्यास आहेत. आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे येथील अनेक नागरिक शिक्षणापासून दूर आहेत. अशा परिस्थितीत डॉ. जयश्री गुट्टे यांनी पुढाकार घेत झोपडपट्टी परिसरात जाऊन ‘हर घर तिरंगा’ अभियानाची जनजागृती केली आहे. या उपक्रमातून वंचित घटकांमध्येही राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचे काम होत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande