यवतमाळ जिल्ह्यात पहिले दोन दत्तक विधान आदेश पारित
दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब यवतमाळ, १३ ऑगस्ट (हिं.स.) : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली अंतर्गत जिल्ह्यातील पहिले दोन दत्तक विधान आदेश पारित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दोन बालकांना प्रेम, सुरक्ष
दोन बालकांना मिळाले स्वत:च्या हक्काचे कुटुंब:दत्तक विधान नियमावलीअंतर्गत जिल्ह्यात पहिला दत्तक आदेश


दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब

यवतमाळ, १३ ऑगस्ट (हिं.स.) : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली अंतर्गत जिल्ह्यातील पहिले दोन दत्तक विधान आदेश पारित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दोन बालकांना प्रेम, सुरक्षितता आणि हक्काचे कुटुंब मिळाले असून, दत्तक पालकांचे अनेक वर्षांचे पालकत्वाचे स्वप्न साकार झाले आहे.

दत्तक विधान ही बालकाला प्रेमळ कुटुंब, सुरक्षितता, आपुलकी आणि उज्ज्वल भविष्य देणारी संवेदनशील सामाजिक प्रक्रिया आहे. जिल्ह्यातील या दोन्ही दत्तक प्रकरणांमध्ये बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी, कागदपत्रांची पूर्तता आणि विविध स्तरांवरील पडताळणी पूर्ण करण्यात आली.

दत्तक प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दत्तक विधान आदेश पारित करून या प्रक्रियेला अंतिम मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल न्याय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करत ही प्रक्रिया यशस्वी केली.

या प्रक्रियेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) माधुरी पावडे, बाल कल्याण समिती तसेच संबंधित इतर यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अधिकृत प्रक्रियेतूनच बालक दत्तक घेण्याचे आवाहन

प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित आणि आनंदी असावे, या उद्देशाला कृतीची जोड देणारी ही दत्तक प्रक्रिया सामाजिक परिवर्तनाची आशादायी नांदी ठरली आहे.

जिल्ह्यातील पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी बालक दत्तक घेताना कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा माध्यमाचा अवलंब करू नये. केवळ अधिकृत आणि कायदेशीर दत्तक प्रक्रियेचाच अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दत्तक विधानासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande