लातूर - पोलीस आपल्या बांधावर उपक्रमातून लिंबाळा दाऊतील दोन रस्ते खुले
लातूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ येथील शेतकऱ्यांसाठी गेल्या तब्बल २५ ते ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस आपल्
पोलीस आपल्या बांधावर


लातूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ येथील शेतकऱ्यांसाठी गेल्या तब्बल २५ ते ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस आपल्या बांधावर’ या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या समन्वयातून गावातील दोन महत्त्वाचे शेतरस्ते खुले करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून शेतात जाण्या-येण्यासाठी अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लिंबाळा दाऊ येथील जुने हरेगाव ते जुने गाव लिंबाळा दाऊ तसेच जुने गाव लिंबाळा दाऊ ते बानेगाव हे दोन शेतरस्ते गेल्या २५ ते ३० वर्षांपासून प्रलंबित होते. रस्ते उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागत होता. शेतीमालाची वाहतूक, मशागतीची कामे तसेच पावसाळ्यात शेतापर्यंत पोहोचताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

शेतकऱ्यांच्या या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाची दखल घेत औसा तहसीलचे अप्पर तहसीलदार स्वामी यांच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने कार्यवाही सुरू केली. यासाठी पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागामध्ये आवश्यक समन्वय साधण्यात आला. या समन्वयातून दोन्ही शेतरस्ते प्रत्यक्षात खुले करण्याची कार्यवाही करण्यात आली.

किल्लारी पोलिसांचा पुढाकार

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘पोलीस आपल्या बांधावर’ उपक्रमांतर्गत किल्लारी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतल्या. केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरती भूमिका मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या निराकरणासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला.

पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव आणि त्यांच्या पथकाने या कार्यवाहीसाठी विशेष प्रयत्न केले. प्रशासन, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दोन शेतरस्ते खुले झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच शेतीमालाची वाहतूक, ट्रॅक्टर व अन्य शेतीची वाहने शेतापर्यंत नेणे आणि मशागतीची कामे करणे सोपे होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात शेतापर्यंत पोहोचण्यासाठी होणारी गैरसोय दूर होणार असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

‘पोलीस आपल्या बांधावर’ उपक्रमाची सामाजिक बांधिलकी

‘पोलीस आपल्या बांधावर’ हा उपक्रम केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधण्याच्या उद्देशाने राबविला जात आहे. लिंबाळा दाऊ येथील २५ ते ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणे हे या उपक्रमाच्या सामाजिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले आहे.

“शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पोलीस प्रशासन आपल्या बांधावर” या भूमिकेतून लातूर पोलीस प्रशासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी यापुढेही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande