
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
जिल्हा परिषदेचा अतिशय महत्त्वाचा विभाग असलेला समाजकल्याण विभाग अधिकारी नसल्याने पोरका झाला आहे. विशेष म्हणजे, मागील नऊ वर्षांपासून समाजकल्याण अधिकाऱ्यांचे स्थायी पद रिक्त असून प्रभारी अधिकाऱ्यांवर काम निभावून नेले जात आहे. प्रभारी अधिकारी नेहमीच उपस्थित राहत नसल्याने या विभागाच्या योजना राबविताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. विशेष म्हणजे, २०१७ पर्यंत भाऊराव चव्हाण हे एकमेव स्थायी जिल्हा समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यरत होते, तेव्हापासून तब्बल ११ अधिकाऱ्यांनी प्रभारी अधिकारी म्हणूनच कामकाज सांभाळले आहे. मात्र आता तर परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. सध्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या जिल्ह्याचाही प्रभार असल्याने ते क्वचितच अमरावती जिल्हा परिषदेत उपस्थित राहतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थायी अधिकारी नसल्यामुळे समाजकल्याण विभागाच्या अनेक योजना रखडल्या आहेत. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती तसेच मागासवर्गीयांसाठी समाजकल्याण विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात.
आश्रमशाळांची तपासणी संशयाच्या भोवऱ्यात
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या तपासणीची महत्त्वाची जबाबदारी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे असते, मात्र अधिकाऱ्यांकडे अन्य जिल्ह्याचा प्रभार असल्याने त्यांच्या अधिनस्थ कर्मचारी थातूरमातूर तपासणी करीत असल्याची ओरड होत आहे. एवढ्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी कनिष्ठ कर्मचारी सांभाळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकाच टेबलवर अनेकांचा निशाणा
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला स्थायी अधिकारी नसल्याचे पाहून या विभागातील कर्मचाऱ्यांकडून एकाच टेबलवर काम करण्याचा आग्रह दिसून येतो. काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच मलाईदार टेबलवर काम करीत असून त्यांची कार्यालय बदली किंवा टेबल बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये मात्र रोष दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी