
लातूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)
देवणी शहरात हॉटेल्स, उपाहारगृहे, मिठाई दुकाने, दूध विक्री केंद्रे, हातगाड्या व विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची संख्या वाढत असताना अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षिततेची नियमित तपासणी होते का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित या विषयाकडे अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत नियमित तसेच अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल, मसाले, बेकरी पदार्थ, पेये तसेच पॅकेज्ड खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच कच्चा माल, साठवणूक, स्वच्छता, पिण्याचे
पाणी, तेलाचा वापर, कालबाह्य पदार्थ व परवाने यांचीही पडताळणी आवश्यक आहे. संशयास्पद पदार्थ आढळल्यास नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करून कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
हॉटेलपासून शाळांपर्यंत तपासणी
हॉटेल व उपाहारगृहांतील स्वयंपाकघर स्वच्छता, अन्न साठवणूक, पाणी, भांडी, तेल व कर्मचाऱ्यांची स्वच्छता यांची तपासणी आवश्यक आहे. तसेच शाळा-महाविद्यालय परिसरातील कँटीन व खाद्यविक्रेत्यांची विशेष तपासणी करावी, अशी मागणी आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित अन्न मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
नियम पाळणाऱ्यांना मार्गदर्शन, भेसळखोरांवर कारवाई
देवणीतील खाद्य व्यवसायांची नियमित तपासणी करून नियम पाळणाऱ्यांना मार्गदर्शनद्यावे; मात्र जाणीवपूर्वक नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची भूमिका आहे.
मुंढे यांच्या धर्तीवर 'अॅक्शन'ची मागणी
अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तपासणी व अंम लबजावणीवर भर दिला आहे. दूध व्यवसायातील संकलन केंद्रापासून डेअरी, वाहतूक व विक्रीपर्यंत संपूर्ण साखळीवर लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. हीच पारदर्शक व नियोजनबद्ध तपासणी पद्धत देवणीतही राबवावी, अशी मागणी आहे.
अन्नाबाबत संशय असल्यास नागरिकांनी थेट तक्रार करावी. मात्र तक्रारींची वाट न पाहता प्रशासनाने स्वतःहून तपासणी करणे हीच प्रभावी उपाययोजना ठरेल. देवणीकरांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करते का, याकडे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis