
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। कर्नाटकातून महाराष्ट्रातील विविध भागांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसची परमिट तपासणी करण्यात आली. यामध्ये चुकीचे परमिट असलेल्यापाच बसेस अक्कलकोट आगाराच्या पथकाने ताब्यात घेतल्या. अचानक बससेवा थांबविण्यात आल्याने संबंधित बसेसमधील प्रवाशांची काही काळ तारांबळ उडाली.
कर्नाटकातील कलबुर्गी, जेऊर्गी, आळंद आणि अफजलपूर आगारांच्या बसेस मोठ्या प्रमाणावर अक्कलकोट तालुक्यातून महाराष्ट्रातील विविध भागांत प्रवासी वाहतूक करतात. काही बसेसना एका विशिष्ट मार्गाचे परमिट असताना त्या अन्य मार्गावरून प्रवासी वाहतूक करीत असल्याची माहिती अक्कलकोट आगाराला मिळाली होती.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट आगार व्यवस्थापक सत्यजित खताळ यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या बसेसची तपासणी सुरू केली. प्रत्येक बस थांबवून तिच्या परमिटची पाहणी करण्यात आली.
योग्य परमिट असलेल्या बसेसना तपासणीनंतर मार्गस्थ करण्यात आले.मात्र, ज्या बसेसचे परमिट चुकीचे आढळले, त्या बसेस ताब्यात घेऊन अक्कलकोट आगाराच्या आवारात लावण्यात आल्या. अचानक बसेस थांबविण्यात आल्याने प्रवाशांना काही काळ गैरसोयीला सामोरे जावे लागले.दरम्यान, चुकीचे परमिट असलेल्या कर्नाटकच्या पाच बसेस ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. सुमारे तीन तासांनंतर संबंधित बसचालक व प्रशासनाला समज देऊन सर्व बसेस सोडण्यात आल्या.‘चुकीच्या मार्गावरून वाहतूक केल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परमिटची तपासणी करण्यात आली. पाच बसेसचे परमिट चुकीचे आढळल्याने त्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर समज देऊन सुमारे तीन तासांनी सर्व बसेस सोडण्यात आल्या,’अशी माहिती आगार व्यवस्थापक सत्यजित खताळ यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड