
लेह, 13 ऑगस्ट (हिं.स.)लडाखमधील लेह शहराला गुरुवारी सकाळी एका शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ६:०५ वाजता लेहमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.५ नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर खोल होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, लोक घाबरून घराबाहेर पडून रस्त्यावर धावले. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने आपल्या 'एक्स' प्लॅटफॉर्मवर लेहमधील भूकंपाची माहिती दिली. यानुसार, लेहमधील भूकंपाचा केंद्रबिंदू ३६.८८१ अंश उत्तर अक्षांश आणि ७४.४०२ अंश पूर्व रेखांश येथे होता.
लेहमध्ये पहाटेच्या वेळी लोक आपापल्या घरात शांतपणे झोपले असताना भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के इतके जोरदार होते की लोकांना झोपेत असतानाही ते जाणवले. घाबरून लोक आपापल्या घरातून बाहेर पळाले.
७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप धोकादायक मानले जातात, तर २.० किंवा त्याहून कमी तीव्रतेच्या भूकंपांना सूक्ष्म भूकंप म्हटले जाते. या वेळी भूकंपाचे धक्के इतके सौम्य असतात की लोकांना ते अनेकदा जाणवत नाहीत. पण, ४.५ किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांना हलक्यात घेऊ नये. अशा भूकंपांमुळे घरे आणि इमारतींचे नुकसान होण्याची शक्यता असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे