
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि आवश्यक विकासनिधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू ज्ञानू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीत मोहोळ मतदारसंघातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, विद्युत व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न आमदार खरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विकासकामांना गती देण्याबरोबरच प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना तातडीने सूचना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे आमदार खरे यांनी सांगितले.
ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न शासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही खरे यांनी सांगितले.
“नागरिकांच्या अडचणी शासन दरबारी मांडून उपलब्ध माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावणे आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देणे, हा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न आहे,” असे आमदार राजू खरे यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड