
पुणे, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। भाडेकरू सह-भागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठीच्या सुधारित आदर्श उपविधीचा मसुदा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in आणि https://mahasahakar.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मसुद्यामध्ये काही सूचना , हरकती, अभिप्राय असल्यास त्या दि. २७ ऑगस्ट, २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत coophsgmodelbyelaws@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ मधील सुधारित तरतुदी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा सविस्तर अभ्यास करून समितीने मसुदा सादर केलेला आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांसंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये दि.२३ जुलै २०१९ रोजीच्या सुधारणा अधिनियमानुसार स्वतंत्र प्रकरण कलम १५४ ब समाविष्ट केलेले आहे. त्याचे नियम शासन स्तरावर दि.१८ जून २०२६ रोजी अंतिम करण्यात आले असून दि.२२ जून २०२६ रोजीच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे नियम सहकार आयुक्त यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मराठी व इंग्रजीमध्ये आदर्श उपविधी तयार करणेसाठी या कार्यालयाने दि.१० डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशान्वये विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती.
भाडेकरू सह-भागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सुधारित आदर्श उपविधींचा विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकतींचा विचार करून सुधारित आदर्श उपविधींना अंतिम स्वरूप देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही श्री.तावरे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु