पाणी योजनेच्या स्वहिश्शासाठी सोलापूर महापालिकेच्या शाळाही विक्रीच्या वाटेवर
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेला सुमारे ३५० कोटी रुपयांचा स्वहिस्सा उभारावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, आता महापालिकेच्या
smc


सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

शहरातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेला सुमारे ३५० कोटी रुपयांचा स्वहिस्सा उभारावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, आता महापालिकेच्या दोन शाळाही विक्रीच्या प्रस्तावात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. या शाळांचा प्रस्ताव महापौर विनायक कोंड्याल यांनी सुचविल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, या दोन शाळांमध्ये सुमारे ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असतानाही सभेच्या अजेंड्यावर शाळांबाबतचा विषय अवघ्या दोन ओळींत मांडण्यात आल्याने प्रस्तावाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उभारण्याच्या नावाखाली सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेवरच परिणाम होणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेला सुमारे ३५० कोटी रुपयांचा स्वनिधी उभारावा लागणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सात महत्त्वाच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला आहे. या माध्यमातून विकासकांकडून एकरकमी विनापरतावा प्रीमियम तसेच वार्षिक भाडे मिळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता दीर्घकाळासाठी खासगी विकासकांच्या ताब्यात देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मात्र, त्याचबरोबर महापालिकेच्या दोन शाळा विक्री करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या शाळांमध्ये ८० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था काय असेल, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे.

महापालिकेच्या शाळा, जागा आणि इतर सार्वजनिक मालमत्ता या केवळ उत्पन्नाचे साधन नसून शहराच्या सार्वजनिक गरजांशी निगडित आहेत. त्यामुळे निधी उभारणी करताना सार्वजनिक मालमत्तांच्या वापराबाबत दीर्घकालीन परिणामांचा विचार करणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande