सोलापूर - रॅपिडोवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्तपणे कारवाई करत एसटी स्थानक परिसरातून ‘रॅपिडो’ ॲपद्वारे अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ११ दुचाकींवर कारवाई केली. यामध्ये एका वाहनावर १० हजार रुपयांहून अध
sdfg


सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्तपणे कारवाई करत एसटी स्थानक परिसरातून ‘रॅपिडो’ ॲपद्वारे अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ११ दुचाकींवर कारवाई केली. यामध्ये एका वाहनावर १० हजार रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला.

आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या नियम व अटींची पूर्तता न झाल्याने राज्यात रॅपिडोच्या माध्यमातून दुचाकीवरून प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही. मात्र, काही तरुण आपल्या दुचाकी रॅपिडो ॲपवर नोंदवून प्रवासी वाहतूक करत असल्याचे कारवाईदरम्यान निदर्शनास आले.

रॅपिडो सेवा काही अन्य राज्यांमध्ये अधिकृतपणे सुरू असली तरी महाराष्ट्रात या सेवेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नसल्याचे आरटीओने स्पष्ट केले. महाराष्ट्रातील वाहतूक नियमांनुसार आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता न झाल्याने ॲपद्वारे दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणे नियमबाह्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी तरुणांना रॅपिडो ॲपवर दुचाकी नोंदवून प्रवासी वाहतूक न करण्याचे आवाहन केले.

रॅपिडो ॲपवरून दुचाकीद्वारे प्रवासी वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. आर्थिक फायद्यासाठी तरुणांनी या ॲपवर आपल्या दुचाकी नोंदवू नयेत. अन्यथा आर्थिक नुकसानासह कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे खोमणे यांनी सांगितले. आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेतर्फे दुचाकीधारकांनी नियमांचे पालन करून अशा प्रकारच्या अनधिकृत प्रवासी वाहतुकीपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande