‘शिवरत्न’चे नामांतर नको; अटलबिहारी वाजपेयींच्या नावाने नवी वास्तू उभारावी : अर्जुनसिंह मोहिते-पाटील
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न’ सभागृहाच्या नामांतरावरून भाजप आणि मोहिते-पाटील गटात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता मोहिते-पाटील कुटुंबीयांकडून नवा पर्याय पुढे आला आहे. विद्यमान ‘शिवरत्न’ सभागृहाचे
ZP news solpaur


सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न’ सभागृहाच्या नामांतरावरून भाजप आणि मोहिते-पाटील गटात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता मोहिते-पाटील कुटुंबीयांकडून नवा पर्याय पुढे आला आहे. विद्यमान ‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलण्याऐवजी जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत, सभागृह, ग्रंथालय किंवा शेतकऱ्यांसाठी निवासस्थान उभारून त्याला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी मांडली आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे ‘शिवरत्न’ हे नाव बदलून ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह’ करण्याचा निर्णय दहा दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर भाजप विरुद्ध मोहिते-पाटील असा राजकीय संघर्ष उफाळून आला.

नामांतराच्या निर्णयाला मोहिते-पाटील समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला. त्यामुळे या मुद्द्यावर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यमान सभागृहाचे नाव बदलण्याऐवजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने नवी वास्तू उभारणे हा अधिक योग्य पर्याय असल्याचे त्यांनी सुचविले आहे. त्यामुळे नामांतराच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता नव्या पर्यायाची चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande