
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९९.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी रात्रीपासून विद्युतगृहातून १,६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे.
गुरुवारी सकाळी सहा वाजता धरणाची पाणीपातळी ४९६.८२० मीटर नोंदविण्यात आली. धरणात ३,३१६.६६ दशलक्ष घनमीटर (११७.११ टीएमसी) एकूण पाणीसाठा असून, उपयुक्त साठा १,५१३.८५ दशलक्ष घनमीटर (५३.४६ टीएमसी) आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी ९९.७८ इतकी आहे. गतवर्षी याच दिवशी उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ११८.१९ टीएमसी, तर उपयुक्त पाणीसाठा ५४.५३ टीएमसी होता.
दरम्यान, दौंड येथे भीमा नदीची पाणीपातळी ४९८.३९० मीटर असून, नदीची आवक ५,५०४ क्युसेक नोंदविण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता सांडवा, विद्युतगृह आणि नदी विसर्ग शून्य होता. मात्र, सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २१० क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ११० क्युसेक, बोगद्यातून ९०० क्युसेक आणि मुख्य कालव्यातून २,५५० क्युसेक विसर्ग सुरू होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड