
पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
उरुळी देवाची येथील कचरा डेपोविरोधातील आंदोलनाचा थेट परिणाम शहराच्या कचरा व्यवस्थापनावर झाला असून, गेल्या सहा-सात दिवसांपासून पुण्यातील कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा विस्कळीत झाली आहे. कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने रस्त्यांच्या कडेला आणि उपलब्ध जागांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसामुळे हा कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.उरुळी देवाची येथील महापालिकेच्या ओपन डंपिंगसह अन्य कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या प्रश्नांवर उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांचे कचरा डेपो परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने शहरातून दररोज गोळा होणारा कचरा पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.णे शहरात दररोज सुमारे २८०० टन कचरा निर्माण होतो. यामध्ये महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचाही समावेश आहे. या कचऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर कचरा उरुळी देवाची येथील प्रक्रिया प्रकल्पाकडे पाठविला जातो.मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उरुळी देवाची येथील प्रकल्पाकडे दररोज जाणारा सुमारे ५०० ते ६०० टन कचरा पाठविता आलेला नाही. त्यामुळे शहरातील कचरा साठवण्याची व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी सध्या शहरात तब्बल ३ ते ४ हजार टन कचरा पडून असल्याचे सांगण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु