
अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारंगपूर ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी, बेजबाबदारपणा आणि गैरकारभाराविरोधात तसेच गावातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवकाने अमरावती शहरातील सातूर्णा परिसरातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
तक्रारकर्ते तथा आंदोलनकर्ते गजानन बोरकर यांनी यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे सारंगपूर ग्रामपंचायतीशी संबंधित विविध तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींवर अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू असून, बोरकर हे सुमारे ५० फूट उंचीवर टॉवरवर बसले असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारे अडविण्याचा प्रयत्न केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी त्यांनी दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या जवळ दोर असल्याचेही सांगण्यात येत असल्याने घटनास्थळी चिंता निर्माण झाली आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून त्यांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, सारंगपूर ग्रामपंचायतीशी संबंधित विविध अभिलेख आणि रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी ते तातडीने सील करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांनी अभिलेख व रेकॉर्ड सील करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली आहे किंवा नाही, याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, सारंगपूर गावातील नागरिकांना मूलभूत पाणीपुरवठा सुरळीतपणे उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगत, पाणीप्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनामुळे प्रशासनासमोर परिस्थिती गंभीर बनली असून, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते आणि टॉवरवर चढलेल्या युवकाला सुरक्षितपणे खाली उतरविण्यात प्रशासनाला यश येते का, याकडे लक्ष लागले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी