
यवतमाळ, 14 ऑगस्ट (हिं.स.) वणी उकणी गावालगतच्या उर्वरित सुमारे ६०० हेक्टर जमिनीचे संपादन, प्रकल्पग्रस्तांना रोजगार आणि गावाच्या पुनर्वसनाचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
डब्ल्युसीएल चे सीएमडी डॉ. हेमंत पांडे यांनी उकणी येथे प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना जमीन संपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पुढे नेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उकणीतील शेतकरी व ग्रामस्थांच्या अपेक्षांना नवी उभारी मिळाली आहे. उकणी गावालगतच्या जमिनीच्या संपादनासह प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. हेमंत पांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया, उकणी गावाचे पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्याच्या मागणीवरही डॉ. पांढे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. गावाचे योग्य ठिकाणी तातडीने पुनर्वसन, प्रलंबित जमीन संपादन आणि रोजगाराच्या प्रश्नांवर लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. दरम्यान, उकणीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न डब्ल्युसीएल प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर प्रभावीपणे मांडण्यासाठी एचसीएस युनियनचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतूनच सीएमढी यांचा उकणी दौरा घडून आल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. यावेळी युनियनचे सचिव शरद धांडे, सेफ्टी बोर्ड मेंबर संजय खाडे, यादव, दीपक जयस्वाल, प्रदीप जेऊरकर यांच्यासह उकणीतील शेतकरी, शेतकरी संघर्ष समिती, उकणी गाव पुनर्वसन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी