
नंदुरबार, 14 ऑगस्ट (हिं.स.) “नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या आदिवासीबहुल जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राधान्याने विकास
करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. या प्रयत्नांत जिल्ह्यातील सर्व
घटकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री
हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
नवापूर येथील शेठ एच. जे. शहा कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी 11.30 वाजता आयोजित शासनाच्या
विविध विभागांच्या विकास योजनांच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार
शिरीष नाईक, नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, परिविक्षाधीन सनदी अधिकारी श्री.पटले, माजी जिल्हा परिषद
अध्यक्ष भरत गावित, प्रतिभा शिंदे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, तालुकास्तरीय
अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दर महिन्याला एका तालुक्याचा आढावा
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, पालकमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारून आता चौथा महिना सुरू झाला
आहे. जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक आणि विकासात्मक परिस्थिती प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी प्रत्येक
महिन्यात न चुकता जिल्ह्यात येऊन एका तालुक्याचा सविस्तर आढावा घेण्याचा शब्द आपण दिला होता.
त्यानुसार शहादा तालुक्यानंतर आता नवापूर तालुक्याचा आढावा घेण्यात आला आहे.
नंदुरबार हा दुर्गम, आदिवासीबहुल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मोठी लोकसंख्या असलेला जिल्हा
आहे. भौगोलिक प्रतिकूलतेमुळे येथील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे
केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणे आवश्यक
आहे. जिल्ह्यात चांगली आणि दर्जेदार विकासकामे व्हावीत, हाच तालुकानिहाय आढावा बैठकांचा प्रमुख
उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य
आरोग्य, शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते आणि दळणवळण या मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणावर सर्व
विभागांनी विशेष लक्ष केंद्रित करावे. पालकमंत्री म्हणून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर योग्य आणि
लोकहिताच्या कामांसाठी करून त्याचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचेल, याची अधिकाऱ्यांनी
दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.
शेत-पाणंद रस्त्यांसाठी 1,600 प्रस्ताव
बैठकीच्या प्रारंभी तहसीलदार दत्ता जाधव यांनी महसूल विभागाचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री
बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेसाठी तालुक्यातून 1,600 प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात
आली. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जुलैअखेरपर्यंतचे सर्व अर्थसहाय्य संबंधित
लाभार्थ्यांना अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर