
माजी उपसरपंच अर्चना चोपडे यांचे बेमुदत उपोषण
अकोला, १४ ऑगस्ट (हिं.स.) | अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीमध्ये सन २०११ ते २०२३ या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवकांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोप माजी उपसरपंच सौ. अर्चना गजानन चोपडे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून तालुकास्तरीय चौकशी समिती रद्द करून पाच सदस्यीय जिल्हास्तरीय उच्च चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली आहे.
चोपडे यांनी यापूर्वी २३ जुलै आणि ३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशासनाला आमरण उपोषणाचे निवेदन दिले होते. त्यानंतर पंचायत समिती अकोला स्तरावर प्राथमिक चौकशी समिती गठीत करण्यात आली. मात्र, तक्रारीचे स्वरूप लक्षात घेता ही समिती योग्य नसून ती मान्य नसल्याचे चोपडे यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचे स्वरूप गंभीर असून त्यामध्ये शासकीय निधीच्या अपहाराचा आरोप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील संभाव्य हितसंबंध लक्षात घेता तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांकडून निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होण्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
शासकीय लेखापरीक्षण अहवालातही संबंधित गैरव्यवहार स्पष्ट झाल्याचा दावा सौ. चोपडे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खातेनिहाय सखोल तपासणी करून निष्पक्ष, स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पाच सदस्यीय जिल्हास्तरीय उच्च चौकशी समिती तातडीने गठीत करावी, अशी त्यांची मागणी आहे.
मागण्या मान्य न झाल्याने अर्चना चोपडे यांनी आज, १४ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाला यापूर्वी इशारा देऊनही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील नागरिकांचेही लक्ष मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीकडे लागले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे