
रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, स्ट्रीट लाईटसह मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्याची मागणी
अकोला, १४ ऑगस्ट (हिं.स.) : आगामी २६ ऑगस्ट २०२६ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त अकोला शहरातून निघणाऱ्या पारंपरिक जुलूसाच्या पार्श्वभूमीवर मरकजी अहले सुन्नत जमात ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीने अकोला महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांना हे निवेदन देण्यात आले. तसेच जुलूस मार्गावर आवश्यक सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी महानगरपालिका आयुक्तांकडेही करण्यात आली. यावेळी हाजी महमूद खान उर्फ हाजी मुदाम, नगरसेवक रफीक सिद्दीकी, जावेद जकरिया, सलीम खान आणि खलील मास्टर उपस्थित होते.
असा असेल जुलूसाचा पारंपरिक मार्ग
यावर्षी जुलूसाचा पारंपरिक मार्ग मोहम्मद अली चौक → फतेह चौक → ओपन एअर थिएटर → सिटी कोतवाली → जुने शहर → जय हिंद चौक → अगरबेस → लकडगंज → माणिक टॉकीज चौक → अकोट स्टँड → सुभाष चौक → मोहम्मद अली चौक असा राहणार आहे.
जुलूसामध्ये मोठ्या संख्येने मुले, ज्येष्ठ नागरिक आणि युवक सहभागी होतात. तसेच लहान-मोठ्या वाहनांसह ऑटोचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. त्यामुळे जुलूस मार्गावरील रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खड्डे बुजविण्यासह स्वच्छतेची मागणी
यावर्षी जुलूस रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने संपूर्ण मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, रस्त्यांची स्वच्छता करणे, कचरा संकलनाची व्यवस्था करणे तसेच पुरेशी स्ट्रीट लाईट आणि विद्युत प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी कमिटीच्या वतीने करण्यात आली.
संबंधित महानगरपालिका विभागांनी जुलूस मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
शांततेत व सुरक्षित वातावरणात जुलूस पार पडण्याची अपेक्षा
ईद-ए-मिलादुन्नबीचा पारंपरिक जुलूस शांततेत, सुव्यवस्थित आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक व्यवस्था करावी, अशी अपेक्षा कमिटीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे