

प्रवासी संघटनेची तातडीच्या उपाययोजनांची मागणी
रायगड, 14 ऑगस्ट (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरताना प्रवाशांना फलाट आणि रेल्वेच्या दरवाजामधील धोकादायक अंतराचा सामना करावा लागत आहे. हे अंतर कमी करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
भिवपुरी रोड स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक मुंबई, नवी मुंबई, पनवेल तसेच कर्जतच्या दिशेने प्रवास करतात. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी लोकलमधून उतरताना प्रवाशांची मोठी लगबग असते. अशावेळी रेल्वेच्या पायरी आणि फलाटामधील अंतरामुळे प्रवाशांचा तोल जाण्याची शक्यता निर्माण होते.
विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. गर्दीच्या वेळी अनेकांना एकमेकांचा आधार घेत लोकलमधून उतरावे लागते. फलाटाची उंची आणि रेल्वेच्या दरवाजामधील अंतरामुळे काही प्रवाशांना उडी मारून खाली उतरावे लागत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
या परिस्थितीमुळे किरकोळ दुखापतींपासून गंभीर अपघातापर्यंतची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भिवपुरी रोड स्थानकाची तातडीने पाहणी करून फलाट आणि रेल्वे यांच्यातील धोकादायक अंतर तांत्रिकदृष्ट्या कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सूचना फलक, सुरक्षा सूचना आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
भिवपुरी रोड स्थानकावरील वाढता प्रवासी भार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)