
गुवाहाटी, 14 ऑगस्ट (हिं.स.)। आसाममध्ये पुराचा प्रकोप काहीसा कमी झाला आहे. आता ३७० गावांतील ७७,५४२ नागरिक प्रभावित आहेत. पुराच्या परिस्थितीत सुधारणा होत असताना धनसिरी नदी (नुमलीगढ) धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहे. प्रभावित लोक मदत छावण्यांमधून आपल्या घरांकडे परतू लागले आहेत. नुकसान झालेल्या घरांच्या संरचनांची तसेच उर्वरित घरांची दुरुस्ती आणि साफसफाईचे कामही वेगाने सुरू आहे. प्रभावितांना मदत करण्याचे काम सरकारी तसेच खासगी स्तरावरही जोरात सुरू आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या १३ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार धनसिरी नदीला पूर आला आहे. राज्यात पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०४ नोंदवण्यात आली आहे. सध्या राज्यातील ७ जिल्हे पुरामुळे प्रभावित आहेत. प्रभावित जिल्ह्यांमध्ये गोलाघाट, शिवसागर, नगाव, होजाई, जोरहाट, दरंग आणि लखीमपूर यांचा समावेश आहे. पुरामुळे या जिल्ह्यांतील २२ महसूल मंडळांमधील एकूण ३७० गावे प्रभावित झाली आहेत. सध्या राज्यातील एकूण ७७,५४२ नागरिक अद्याप प्रभावित आहेत आणि ९,९०८.८५ हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली गेली आहे.
पूरग्रस्त लोकांसाठी अद्याप ३८ मदत छावण्या आणि ३२ मदत वितरण केंद्रे सुरू आहेत. यामध्ये ६,६३९ लोकांनी आश्रय घेतला आहे. शिवसागर जिल्ह्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या कच्च्या घरांची एकूण संख्या १२५ आहे. या जिल्ह्यात १० पक्की घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरातील मदत आणि बचाव मोहिमेत एसडीआरएफ, डीडीआरएफ, पोलीस, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (एफ अँड ईएस), मंडळ कार्यालय/स्थानिक प्रशासन तसेच नागरी संरक्षण/प्रशिक्षित स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
पूरग्रस्त भागांमध्ये गुरुवारी राज्य सरकारने एकूण ५९ वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. यावेळी पाच बोटीही मदतकार्यात सहभागी होत्या. दरम्यान, बोटींच्या माध्यमातून पूरग्रस्त ११९ लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. सरकार सातत्याने आढावा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule