दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाची धमकी
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयासह जामनगर हाऊस, झंडेवालान फ्लॅटेड फॅक्टरी कॉम्प्लेक्स,
दिल्ली सुरक्षेचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयासह जामनगर हाऊस, झंडेवालान फ्लॅटेड फॅक्टरी कॉम्प्लेक्स, एमबी साकेत कार्यालय/डीएम कार्यालय, दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-3 आणि दिल्ली कॅन्टमधील एसडीएम कार्यालय या ठिकाणांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, सर्व संबंधित ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने रवाना करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाला धमकीचा ई-मेल

दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. न्यायालयाच्या परिसरात तसेच न्यायाधीशांच्या कक्षांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. तसेच दुपारी दोन वाजेपर्यंत न्यायालय परिसर रिकामा करण्याची सूचना देत स्फोटाची धमकी देण्यात आली.

ई-मेल मिळताच दिल्ली पोलिसांसह बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यायालय परिसर, कोर्टरूम आणि इतर संवेदनशील भागांची कसून तपासणी करण्यात आली. यासोबतच अँटी-सॅबोटेज तपासणीही सुरू करण्यात आली.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था आधीच कडक करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या परिसराभोवती गस्त आणि तपासणीही वाढवण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्याचा शोध सुरू

स्पेशल सेल आणि सायबर क्राइम युनिटकडून धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा आयपी ऍड्रेस आणि सर्व्हरची माहिती तपासली जात आहे. ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

पोलिसांकडून ही धमकी बनावट (होक्स) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा व्यवस्था तपासणे किंवा नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश असू शकतो, अशी शक्यता तपासली जात आहे. मात्र, कोणताही धोका गृहीत न धरता सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

धमकीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे संयुक्त सचिव आणि वकील कुणाल यांनी ही धमकी बनावट असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगितले. सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाकडून संपूर्ण उच्च न्यायालय परिसराची बारकाईने तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनासाठी 15 ते 20 हजार जवान तैनात

स्वातंत्र्यदिनाच्या तयारीबाबत डीसीपी नॉर्थ राजा बांठिया यांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षेची तयारी सुरू असून त्यासाठी सविस्तर योजना आखण्यात आली आहे.

दहशतवादविरोधी तपासणी, दहशतवादी हल्ल्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यासाठीची योजना, गर्दीचे व्यवस्थापन आणि व्हीआयपी सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

15 ऑगस्ट रोजी विविध सुरक्षा आणि संबंधित यंत्रणांचे सुमारे 15 ते 20 हजार कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, ‘अभिज्ञान’ ऍप्लिकेशन आणि व्हिडिओ विश्लेषण तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार आहे.

उत्तर दिल्लीच्या डीसीपींनी सांगितले की, सुमारे 3 किलोमीटरच्या परिसरात विशेष निगराणी ठेवण्यात आली आहे. पार्किंग पास जारी करण्यात आले असून पार्किंगची समस्या उद्भवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाहतुकीच्या मार्गांबाबत आवश्यक दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतुकीने येणाऱ्या नागरिकांनाही कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, बॉम्बस्फोटाच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असून सर्व संबंधित ठिकाणी कसून तपासणी सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande