साखरपा - रत्नागिरीसाठी बसफेऱ्या सुरू: प्रवाशांची गैरसोय दूर
रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट वाहतुकीसाठी बंद झाल्याने साखरपा परिसरातील प्रवाशांची झालेली गैरसोय दूर करण्यासाठी रत्नागिरी ते पाली आणि साखरपा मार्गावर एसटीच्या विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आंबा घ
साखरपा - रत्नागिरीसाठी बसफेऱ्या सुरू: प्रवाशांची गैरसोय दूर


रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट वाहतुकीसाठी बंद झाल्याने साखरपा परिसरातील प्रवाशांची झालेली गैरसोय दूर करण्यासाठी रत्नागिरी ते पाली आणि साखरपा मार्गावर एसटीच्या विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

आंबा घाट बंद झाल्याने कोल्हापूरहून ये-जा करणाऱ्या एसटी बसफेऱ्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे साखरपा परिसरातून रत्नागिरीकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. रत्नागिरीला कामानिमित्त, शिक्षणासाठी, उपचारांसाठी तसेच विविध शासकीय व खासगी कामांसाठी दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होते.

प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन एसटीच्या रत्नागिरी विभागाने तातडीने निर्णय घेत साखरपा- रत्नागिरी विशेष शटल बस सेवा सुरू केली आहे. या विशेष सेवेमुळे साखरपा आणि परिसरातील प्रवाशांना रत्नागिरीकडे जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध झाली आहे.त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आंबा घाट बंद झाल्यानंतर साखरपा परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि रोजच्या कामासाठी रत्नागिरीला जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर एसटी विभागाने घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. नियमित बससेवा पूर्ववत होईपर्यंत विशेष शटल सेवा सुरू राहिल्यास साखरपा परिसरातील नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे.

प्रवाशांची अडचण ओळखून तातडीने बससेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त होत असून,आंबा घाटातील वाहतूक सुरळीत होईपर्यंत ही सेवा सुरू ठेवावी, अशी अपेक्षाही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande