तुळजाभवानीच्या लाखो भाविकांच्या सुरक्षेशी तडजोड करून उद्घाटनाचा घाट कशासाठी?
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। तुळजाभवानीच्या लाखो भाविकांच्या सुरक्षेशी तडजोड करून उद्घाटनाचा घाट कशासाठी? असा सवाल धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारला विचारला आहे आमदार पाटील म्हणाले की, तुळजापूर येथील श्री तुळ
अ


छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

तुळजाभवानीच्या लाखो भाविकांच्या सुरक्षेशी तडजोड करून उद्घाटनाचा घाट कशासाठी? असा सवाल धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारला विचारला आहे

आमदार पाटील म्हणाले की,

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या गुणवत्तेबाबत आणि त्यांच्या निर्मिती कंपनीबाबत आपण विधिमंडळाच्या सभागृहात गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. हे CCTV कॅमेरे चिनी कंपन्यांनी निर्मित केलेले असल्याची बाब समोर आल्यानंतर, लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचे स्पष्ट केले होते..

मात्र, इतका गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित करूनही ना गृह मंत्रालयाने याबाबत जबाबदारी स्वीकारून उत्तर दिले ना संबंधित मंत्र्यांकडूनही स्पष्टीकरण मिळाले. त्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे..

एकीकडे CCTV यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना, दुसरीकडे आज याच CCTV कॅमेऱ्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकार म्हणजे सुरक्षेच्या प्रश्नावर पडदा टाकून केवळ उद्घाटनाची घाई करण्यासारखा आहे..

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून दरवर्षी लाखो भाविक तुळजापूरमध्ये येतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही कोणत्याही राजकीय श्रेयापेक्षा मोठी आहे. अशा परिस्थितीत CCTV कॅमेऱ्यांची गुणवत्ता, डेटा कुठे साठवला जातो, त्याची सुरक्षा कशी केली जाते, संबंधित उपकरणांची तांत्रिक तपासणी झाली आहे का आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या यंत्रणेची विश्वासार्हता तपासण्यात आली आहे का, याची स्पष्ट उत्तरे सरकारने भाविकांसमोर ठेवणे आवश्यक आहे..

कॅमेरे बसवले म्हणजे सुरक्षा व्यवस्था सक्षम झाली असे होत नाही. कॅमेऱ्यांची गुणवत्ता आणि त्यामागची संपूर्ण तांत्रिक यंत्रणा विश्वासार्ह असणे तितकेच महत्त्वाचे आहे. भाविकांच्या सुरक्षेशी संबंधित इतका गंभीर विषय प्रलंबित ठेवून केवळ लोकार्पणाचा सोहळा उरकण्याची घाई सरकारला का आहे? गंभीर प्रश्नांची उत्तरे न देता उद्घाटनाचा घाट कशासाठी? लाखो भाविकांची सुरक्षा रामभरोसे ठेवणार का? आणि उद्घाटनापूर्वी या CCTV यंत्रणेच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षेबाबत सरकार भाविकांना स्पष्ट स्पष्टीकरण देणार का?

तुळजाभवानीच्या भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न हा राजकीय श्रेयाचा विषय नाही. सरकारने आधी प्रश्नांची उत्तरे द्यावीत, तांत्रिक आणि सुरक्षाविषयक तपासणी स्पष्ट करावी, त्यानंतरच उद्घाटनाची औपचारिकता पार पाडावी. अन्यथा, एखादी अनुचित घटना घडल्यावर जागे होण्यापेक्षा आजच सरकारने या गंभीर प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande