
सीएनजीने प्रथमच १०० रुपयांचा टप्पा ओलांडला
जिल्ह्यातील वाहनधारकांवर आर्थिक बोजा
अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असतानाच आता सीएनजीच्या दरवाढीने वाहनधारकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अमरावती शहर व जिल्ह्यात हजारो वाहने सीएनजीवर धावत असून, गेल्या चार महिन्यांत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो तब्बल ८ रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सीएनजीचे मदर स्टेशन सुरू झाल्यानंतरही दरवाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सुमारे अडीच वर्षांपासून सीएनजीचा पुरवठा सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात या इंधनावर धावणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढली आहे. सध्या सुमारे ३२०० वाहने सीएनजीवर धावत असल्याचे सांगण्यात येते.
सीएनजीचा पुरवठा सुरू झाला तेव्हा त्याचा दर प्रतिकिलो ९० रुपये होता. त्यानंतर सुमारे वर्षभर दर स्थिर राहिला. मात्र, पुढील काळात सीएनजीच्या दरात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या चार महिन्यांतच प्रतिकिलो ८ रुपयांची वाढ झाल्याने सीएनजीने प्रथमच १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
मदर स्टेशन सुरू होऊनही दरवाढ
पूर्वी अमरावतीला सीएनजी लातूर जिल्ह्यातून टँकरद्वारे आणला जात होता. त्यामुळे वाहतूक खर्चाचा अतिरिक्त भार पडत होता. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बोरी येथे सीएनजीचे मदर स्टेशन सुरू झाले आहे. शहरापासून हे मदर स्टेशन सुमारे ४५ ते ५० किलोमीटर अंतरावर आहे.
जिल्ह्यातच सीएनजीचा पुरवठा उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्च कमी होईल आणि त्याचा फायदा ग्राहकांना मिळून दर कमी होतील, अशी अपेक्षा वाहनधारकांना होती. अदानी टोटल गॅसच्या अधिकाऱ्यांकडूनही सुरुवातीला वाहतूक खर्च कमी झाल्याचा फायदा दरांमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात दर कमी होण्याऐवजी सातत्याने वाढल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी आहे.
मूळ किमतीतील वाढीमुळे दरवाढ
याबाबत योगेशकुमार पारधी, प्रमुख, विदर्भ, अदानी टोटल गॅस यांनी सांगितले की, केंद्र सरकारने देशपातळीवर सीएनजीच्या मूळ किमतीत वाढ केली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातही सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.
चार महिन्यांत प्रतिकिलो ८ रुपयांची झालेली वाढ सीएनजी वाहनधारकांसाठी मोठा आर्थिक भार ठरत आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत किफायतशीर पर्याय म्हणून सीएनजी वाहनांकडे वळलेल्या नागरिकांना आता वाढत्या इंधन खर्चाचा सामना करावा लागत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी