
कोल्हापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडूनही प्रत्यक्ष जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात, तसेच पूर्वी 'एसइबीसी' व्हॅलिडिटी घेतलेल्या नागरिकांना आता कुणबी व्हॅलिडिटी मिळण्याचा मार्ग मोकळा करावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य सचिवांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, सन २०२३-२४ मध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून राज्यभरात ५६ लाख, तर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १ लाख ४० हजार कुणबी नोंदी शोधण्यात आल्या. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदी उपलब्ध असतानाही जिल्ह्यातील अवघ्या १० टक्के नागरिकांनाही अद्याप कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही. पडताळणी समितीकडून किरकोळ व तांत्रिक कारणांवरून प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्या जात असल्याने ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तात्काळ सहज, सुलभ आणि पारदर्शक करावी.
एसइबीसी धारकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी
शासकीय दप्तरांमध्ये कुणबी नोंदी उपलब्ध असूनही त्या वेळेत समोर न आल्याने अनेक विद्यार्थी व उमेदवारांनी शैक्षणिक आणि नोकरीच्या तातडीच्या गरजेपोटी पूर्वी एसइबीसी प्रवर्गातून दाखले व व्हॅलिडिटी काढून घेतली होती. आता शिंदे समितीच्या शोधमोहिमेनंतर मूळ कुणबी नोंदी समोर आल्या असताना, पूर्वी एसइबीसी व्हॅलिडिटी केली होती या तांत्रिक कारणास्तव संबंधित उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्र व व्हॅलिडिटी नाकारली जात आहे.
दप्तर वेळेत समोर न येणे ही प्रशासकीय बाब असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये. ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांचे पूर्वीचे एसइबीसी प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी जमा करून घेऊन त्यांना तात्काळ कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संशोधन अधिकारी संभाजी पोवार यांनी निवेदन स्विकारले .
निवेदन देताना सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, रुपेश पाटील, चंद्रकांत पाटील, शशीकांत पाटील, विजय पाटील, सुनिता पाटील, सरदार पाटील, दिलीप सावंत, लता जगताप, मोहन सुर्वे, शंकरराव शेळके आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar