
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांच्या कथित ‘कॉकरोच’ वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद अद्याप शांत झालेला नसतानाच नालसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. नालसार विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास काही विद्यार्थ्यांनी नकार दिल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईची भूमिका घेतली होती. मात्र, आता खुद्द सरन्यायाधीशांनी बार कौन्सिलच्या भूमिकेवरच कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
नालसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्याला पत्र लिहून शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले होते, असे न्या. सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. “मी विद्यार्थी असतानासुद्धा आंदोलनं केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल किंवा विद्यापीठाने कोणतीही कारवाई करू नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली. “माझा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न असताना यामध्ये बार कौन्सिलला पडायची काय गरज?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, दीक्षांत समारंभासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यास विरोध केला होता. विद्यार्थ्यांना ‘कॉकरोच’ संबोधणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते पदवी स्वीकारायची का, असा सवाल करत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र दिले होते. या प्रकरणानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या भूमिकेवरही मोठी चर्चा झाली. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनीही विद्यार्थ्यांची वकिली रोखण्यासाठी बार कौन्सिलची बैठक झाली होती का, अशी विचारणा केल्याचे समोर आले.
मे महिन्यातील एका सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुणांविषयी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या ‘कॉकरोच’ या कथित उल्लेखामुळे देशभरातून टीका झाली होती. या वक्तव्यानंतर अभिजित दिपके यांच्या उपरोधिक सोशल मीडिया पोस्टमधून ‘कॉकरोच पार्टी’ची चर्चा सुरू झाली. त्यानंतर या मुद्द्याला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचीही जोड मिळाली. आता सरन्यायाधीशांनीच बार कौन्सिलला विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याचा स्पष्ट संदेश दिल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule