
जळगाव, 14 ऑगस्ट (हिं.स.) इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या कालावधीत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ तसेच ‘पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम’ योजनांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवास व भोजनाची सुविधा मिळावी, यासाठी शासनामार्फत या दोन्ही योजना राबविण्यात येत आहेत. चालू शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर विहित कालावधीत प्रवेश अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचणी उद्भवल्यास कार्यालयाच्या 0257-226328 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, ‘सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव’ येथे प्रत्यक्ष संपर्क साधता येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल राठोड यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर