परळीत ५६४ कोटींच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे शनिवारी भूमिपूजन
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कोनशिला समारंभ; पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी बीड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत परळी वैजनाथ येथे उभारण्यात येत असलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनश
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कोनशिला समारंभ; पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी

बीड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत परळी वैजनाथ येथे उभारण्यात येत असलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळा स्वातंत्र्यदिनी, शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्याशेजारील नंदागोळ रोड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह आमदार धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, बसवराज पाटील, डॉ. परिणय फुके, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, चैनसुख संचेती, राजकुमार बडोले आणि संजय मेश्राम तसेच नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मान्यवरांची विशेष उपस्थिती

कार्यक्रमाला महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तसेच विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य इंजि. गोविंद बापूराव नरवडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

पशुसंवर्धन क्षेत्राला मिळणार नवी दिशा

परळी येथे उभारण्यात येणारे पशुवैद्यकीय महाविद्यालय केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता पशुवैद्यकीय सेवा, प्राणी रुग्णालय, संशोधन, निदान सेवा तसेच पशुपालकांसाठी प्रशिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे परळी आणि परिसरातील विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच पशुपालकांना आधुनिक पशुवैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात येणारे हे पशुवैद्यकीय संकुल भविष्यात हजारो पशुपालकांना सेवा, शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि पशुसंवर्धन क्षेत्राला तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

५६४ कोटींच्या प्रकल्पाची कोनशिला

या ५६४ कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे परळीच्या शैक्षणिक, पशुसंवर्धन आणि कृषीपूरक क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी मोठी पायाभूत गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (पशुविज्ञान शाखा) डॉ. क्षितिज उपाध्ये, विद्यापीठ अभियंता प्रमोदकुमार तायडे आणि पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परळी वैजनाथचे प्रकल्प अधिकारी डॉ. प्राणेश येवतीकर यांनी केले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande