
पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक जागा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सरावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला केली आहे.ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानग्या घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महापालिकेने ‘एक खिडकी’ व्यवस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना नागपुरे यांनी केली. या माध्यमातून पथकांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील, अशी व्यवस्था करण्याचे त्यांनी सांगितले.
सरावाच्या परवानग्या ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने देण्याची सुविधाही महापालिकेने उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे पथकांना परवानगी प्रक्रियेसाठी अनावश्यक वेळ आणि श्रम खर्च करावे लागणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.सरावाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, अशी सूचनाही महापौरांनी केली. गणेशोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर महापालिका प्रशासनाने भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु