रायगड - जलसंधारण दिनानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन
रायगड, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। रायगड- : जलसंधारण दिनानिमित्त १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींमध्ये माती व पाण्याच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ ही जिल्हास्तरीय समाजमाध्यम रील स्पर्ध
District-level-competition-org


रायगड, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। रायगड- : जलसंधारण दिनानिमित्त १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींमध्ये माती व पाण्याच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ ही जिल्हास्तरीय समाजमाध्यम रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमात जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील यांनी केले आहे.

‘माती वाचवा, पाणी वाचवा, सुरक्षित उद्या घडवा’ हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे. स्पर्धकांनी मातीसंवर्धन, जलसंधारण, पाणी बचत, पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा संदेश प्रभावीपणे मांडणारी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करायची आहे. ही रील सार्वजनिक समाजमाध्यम खात्यावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

रीलच्या सुरुवातीला स्पर्धेचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव सांगणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित विभागाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्याला टॅग करून #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट रीलची जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. विजेत्यांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ म्हणून सन्मानित करण्यात येणार असून, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रकासह प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी अधिकृत QR कोडद्वारे नोंदणी, रील लिंक सादरीकरण, जिल्हा निवड, पडताळणी आणि सहभाग प्रमाणपत्र अशी प्रक्रिया राहणार आहे. इच्छुक युवक-युवतींना register.mahaevent.co.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. ‘एक रील... मातीसाठी! एक रील... पाण्यासाठी! एक रील... सुरक्षित भविष्यासाठी!’ या संदेशासह युवक-युवतींनी या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कविजीत पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande