मेळघाटच्या डोमा आश्रमशाळेत शिक्षणाचा बोजवारा
जीवशास्त्राला शिक्षकच नाही, विद्यार्थी डेक्सबेंचविनाच! गंभीर प्रकरणावर नेते मंडळींचे ही दुर्लक्षच! अमरावती, 14 ऑगस्ट (हिं.स.) । मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅब, अत्याधुनिक प्रयोगशाळेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न सुरू अस
डोमा आश्रमशाळेत शिक्षणाचा बोजवारा;   जीवशास्त्राला शिक्षकच नाही, विद्यार्थी डेक्सबेंचविनाच!


जीवशास्त्राला शिक्षकच नाही, विद्यार्थी डेक्सबेंचविनाच! गंभीर प्रकरणावर नेते मंडळींचे ही दुर्लक्षच!

अमरावती, 14 ऑगस्ट (हिं.स.) । मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅब, अत्याधुनिक प्रयोगशाळेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे डोमासारख्या मोठ्या आश्रमशाळेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘जीवशास्त्र’ हा विषय शिकविण्यासाठी वर्षभरापासून शिक्षक उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. निवासी शिक्षणासाठी असलेल्या नववी ते अकरावीच्या काही विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये आठवड्यापूर्वी झालेल्या बदलामुळे डोमा ही आश्रमशाळा रिकामी झाली होती. तेव्हापासून येथील व्यवस्था अधिकच चर्चेत आली आहे.

वर्ग एक ते १२ मध्ये एकूण ८५२ मुले-मुली शिक्षण घेतात. त्यापैकी ६१० विद्यार्थी निवासी स्वरूपात येथे राहतात. त्यात २६३ मुले, तर ३४७ मुलींचा समावेश आहे. तर बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलामुलींची एकूण संख्या १२६ च्या घरात असून, त्यात ६५ मुले आणि ६१ मुलींचा समावेश आहे. डोमा आश्रमशाळेमध्ये केवळ नऊ ते १२ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्यांमध्ये डेक्सबेंच प्रशासनाने उपलब्ध करून दिले असून, वर्ग एक ते आठवीमध्ये शिक्षणाऱ्या मुलामुलींना फाऱ्यांवरच बसून धडे गिरवावे लागत असल्याचे वास्तव येथील भेटीदरम्यान बघायला मिळाले. बारावीच्या ‘जीवशास्त्र’ याविषयात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी तत्त्वावर एका शिक्षकाची नियुक्त केली होती. परंतु ते फारकाळ टिकले नाहीत. त्यामुळे याविषयाच्या शिक्षकाचे पद रिक्तच आहे, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.

केवळ डोमा आश्रमशाळेमध्येच नव्हे तर मेळघाटातील बहुतांश शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये अशाच अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दिसून येते. डिजिटल लॅबचे चित्र प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धारणी प्रकल्प कार्यालयांतर्गत प्रशस्त अशा अत्याधुनिक पाच डिजिटल लॅबच्या इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे बसण्याकरिता वर्गखोल्यांत अर्ध्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना डेक्स-बेंचची मूलभूत सुविधासुद्धा नाही.तर या परिसरातील नेते मंडळी जिल्ह्याचे खासदार ही या गंभीर विषयाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे बोलल्या जात आहे.

जारिदा आश्रमशाळेत समस्या कायम

डोमा गावापासून जवळच असलेल्या जारिदा येथील शासकीय आश्रमशाळेची इमारत १९७२ ची असून, ५५ वर्षे होत आली आहेत. येथेही एक हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात ४७५ मुले आणि ५२६ मुलींच्या समावेश आहे. त्यापैकी ३५९ मुले व ४१० मुली निवासी स्वरूपात आहेत. येथेही माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. नवीन इमारतीचे बांधकाम बाजूलाच सुरू आहे. शाळेची नवीन इमारत पूर्ण व्हायला सहा महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. येथेही ‘भौतिकशास्त्र’ विषय शिकवायला शिक्षक नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande