
बीड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। सततचा मानसिक त्रास, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून साकुड येथील श्रीहरी रामराव चाटे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकुड येथील रहिवासी सोमनाथ श्रीहरी चाटे (वय ३०, व्यवसाय शेती) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी रामभाऊ मुंज्जाजी चाटे, मनोजकुमार रामभाऊ चाटे, अनिकेत रामभाऊ चाटे, हरीभाऊ उर्फ पप्पू बळीराम चाटे (सर्व रा. साकुड) आणि भिमराव संभाजी मुसळे (रा. कवठळी, ता. परळी) हे सोमनाथ चाटे यांच्यासह त्यांच्या वडिलांना वारंवार शिवीगाळ, दगडफेक, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून चाटे कुटुंबीय गावातून शेतात राहण्यास गेले होते. ११ ऑगस्टच्या रात्री आरोपींनी पुन्हा शेतातील घरी येऊन शिवीगाळ करत धमकी दिली.
या सततच्या जाचाला कंटाळून १२ ऑगस्ट रोजी सकाळी श्रीहरी चाटे यांनी विठ्ठल चाटे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता खिशात एक चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये पाचही आरोपींच्या त्रासामुळेच आत्महत्या करत असल्याचा स्पष्ट उल्लेख होता.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis