
लातूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे देशमुख कुटुंबीय, मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली.
शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे गायिका सौ. वंदना कांबळे यांनी संतवाणी हा कार्यक्रम सादर केला. लातूरसह राज्यभरात यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विकासाला नवी दिशा देणारे नेतृत्व
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांनी आधुनिक दृष्टिकोन आणि दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग या विविध क्षेत्रांसह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दिलेले त्यांचे बहुमोल योगदान सदैव स्मरणात राहील. विकासाला गती देतानाच सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचे विचार, कार्य आणि लोकसेवेची शिकवण कायम स्मरणात ठेवून त्यांनी घालून दिलेला लोकसेवेचा वसा पुढे चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या पुढील पिढीतून करण्यात येत आहे.
देशमुख कुटुंबीयांकडून पुष्पांजली
लोकनेते विलासराव देशमुख यांना विलासबाग, बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, विनायकराव पाटील, शहाजी पाटील, अभिजीत देशमुख, डॉ. सारिका देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली.
लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली अर्पन करण्यासाठी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, मनपा आयुक्त राहूल कुलकर्णी, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी रोहीनी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, मनपा उपआयुक्त पंजाबराव खानसुळे, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार, व्हा.चेअरमन वैजनाथराव शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा परीषद अध्यक्षा उषा पाटील, उपमहापौर स्नेहल उटगे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अभय सांळुके, श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. शिवाजीराव जवळगेकर, ॲड.किरण जाधव, लक्ष्मीरमण लाहोटी, धनंजय देशमुख या उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis