
अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली असली तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची समस्या अद्याप कायम असल्याचे चित्र दर्यापूर तालुक्यातील एरंडगाव येथे पाहायला मिळत आहे. गावातील रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्था असून, त्याचा मोठा फटका विद्यार्थी, शेतकरी, वाहनचालक आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट होत असून, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि चिखलामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, शेतकऱ्यांनाही शेतात जाणे-येणे कठीण झाले आहे. वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, दरवर्षी याच मार्गावरून तब्बल ६० ते ७० गजानन महाराजांच्या पालख्या शेगावकडे जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या दुरवस्थेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एरंडगाव येथील रहिवासी भूषण चौखंडे यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासन तातडीने कोणती भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी