
काँग्रेसने ओबीसींचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप
वर्धा, १४ ऑगस्ट (हिं.स.) : स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात आणि महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना होत असून, हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. देवळी येथे आयोजित महा राजस्व अभियानाच्या सांगता कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. जातनिहाय जनगणनेमुळे राज्यातील विविध समाजघटकांची वास्तविक संख्या, सामाजिक स्थिती आणि त्यांच्या हक्कांशी संबंधित माहिती स्पष्टपणे समोर येईल. त्यामुळे प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य हक्क आणि न्याय मिळण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसवर जोरदार टीका
काँग्रेसने आपल्या दीर्घ सत्ताकाळात जातनिहाय जनगणनेबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला. ओबीसी समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात आला, असेही त्यांनी म्हटले.
आज काँग्रेसचे नेते जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर आंदोलने आणि मोर्चे काढत असले, तरी हा प्रयत्न केवळ राजकीय नौटंकी असल्याची टीका त्यांनी केली.
सामाजिक व आर्थिक धोरणांना मिळणार आधार
जातनिहाय जनगणनेमुळे अठरापगड जातींसह सर्व समाजघटकांची जातनिहाय वर्गवारी आणि वस्तुस्थिती समोर येणार आहे. या माहितीच्या आधारे शासनाला सामाजिक आणि आर्थिक धोरणे अधिक प्रभावीपणे आखता येतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
हा निर्णय केवळ जनगणनेपुरता मर्यादित नसून सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा क्रांतिकारी निर्णय असून, त्यातून वंचित आणि मागास समाजघटकांना त्यांच्या हक्कांसाठी अधिक सक्षम आधार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी