
रोहयोतून शेतरस्त्यांची कामे; शेतीसाठी वाहतूक सुलभ, वेळ आणि श्रमासह खर्चाचीही बचत
अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : वरुड तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात पांदन रस्त्यांची कामे करण्यात आल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षानुवर्षे पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे शेतात जाण्यासाठी होणारी कसरत अनेक गावांमध्ये कमी झाली असून, शेतीची कामे करणे अधिक सुलभ झाले आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतरस्ते आणि पांदन रस्त्यांची कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात शेतमाल, खते, बियाणे आणि शेतीची अवजारे शेतापर्यंत ने-आण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खराब पांदन रस्त्यांमुळे ट्रॅक्टर आणि अन्य वाहने शेतापर्यंत पोहोचणेही अनेकदा कठीण होत असे. मात्र रस्त्यांची कामे झाल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
पांदन रस्ते सुस्थितीत झाल्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच अन्य वाहने थेट शेतापर्यंत पोहोचू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचण्यासोबतच वाहतुकीचा खर्चही कमी होण्यास मदत होत आहे. पावसाळ्यात शेतीच्या कामांना वेग देण्यासाठी या रस्त्यांचा मोठा फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे एकीकडे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी मिळत असून, दुसरीकडे गावातील मूलभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळत आहे. पांदन रस्त्यांसारखी कामे झाल्यामुळे सार्वजनिक सुविधा निर्माण होण्याबरोबरच शेतीला थेट फायदा होत असल्याने ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहे.
तालुक्यातील अद्याप खराब असलेल्या पांदन रस्त्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी कामे करण्यात यावीत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. पांदन रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करून त्यांची नियमित देखभाल केल्यास ग्रामीण भागातील शेती व्यवसायाला आणखी चालना मिळू शकते.
रोजगार निर्मितीसोबतच शेतकऱ्यांच्या विकासाला हातभार लावणारी दुहेरी भूमिका बजावत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना वरुड तालुक्यात ग्रामीण विकासाचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी