
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणींबाबत फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली..
यावेळी खालील प्रमुख मुद्दे मांडले :
१) शेती विकल्यामुळे सध्या जमिनीच्या नोंदी नसलेल्या पात्र शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होत नसल्याची अडचण दूर करावी.
२) मयत शेतकऱ्यांच्या वारसांच्या नावावर शेती नसल्यामुळे ई-केवायसी व फार्मर आयडी तयार होत नसलेल्या प्रकरणांसाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी.
३) पोर्टलवरील कर्जमाफीची रक्कम आणि संबंधित बँकेच्या नोंदीतील रकमेतील तफावत दूर करून योग्य रक्कम निश्चित करावी.
४) फार्मर आयडी उपलब्ध असूनही ई-केवायसी वेळी ‘Not Found’ असा संदेश येण्याची तांत्रिक अडचण तातडीने दूर करावी.
५) लाभार्थी यादीतील चुकीचे बँक खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
६) वारसफेर झाल्यानंतर मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करावी.
७) सामायिक (संयुक्त) जमिनींच्या प्रकरणांमध्ये कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात.
८) ई-केवायसीवेळी आधार क्रमांक अद्ययावत न होण्याची समस्या सोडवण्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्यावी.
९) कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असतानाच शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप लवकरात लवकर सुरू करावे, अशीही मागणी केली..
या सर्व अडचणींवर तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.. असे त्यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis