
उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या गावाला एक कोटींचा विकास निधी
महावितरणच्या ‘रूफ टॉप सोलार योजना’ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पाच गावांची निवड; ग्रामस्थांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ, १४ ऑगस्ट (हिं.स.) : महावितरणच्या ‘रूफ टॉप सोलार योजना’ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमधून पाच गावांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये फुलसावंगी गावाचाही समावेश आहे. गावातील पात्र घरांवर सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. निर्धारित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या गावाला महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात येणार असल्याने या योजनेला स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे.
योजनेची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी फुलसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता रुपेश टेभुरणे, उपकार्यकारी अभियंता ज्योती सांभे, महागावचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत अंबाळकर आणि फुलसावंगीचे सहाय्यक अभियंता राहुल डोंगरे यांनी ग्रामस्थांना योजनेची माहिती दिली.
‘रूफ टॉप सोलार योजना’ अंतर्गत पात्र घरांच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानासह ग्राहकांच्या सहभागातून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना पारंपरिक वीज वापरावरील खर्च कमी करण्यासोबतच आपल्या घरावरच सौरऊर्जा निर्मिती करण्याची संधी मिळणार आहे.
अधिकाऱ्यांनी पात्र वीज ग्राहकांनी योजनेत नोंदणी करून सौरऊर्जा यंत्रणा बसवून घेण्याचे आवाहन केले. गावातील जास्तीत जास्त पात्र कुटुंबांनी या योजनेत सहभागी होऊन निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले.
विकास निधीची दुहेरी संधी
फुलसावंगीला मिळालेली ही संधी केवळ सौरऊर्जा निर्मितीपुरती मर्यादित नसून, स्पर्धेत यश मिळाल्यास गावाच्या विकासासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ‘सौरऊर्जा निर्मितीत आघाडी आणि विकास निधीतही बाजी’ अशी दुहेरी संधी गावासमोर उभी राहिली आहे.
सभेला रवि पांडे, बाबुखान पठाण, उमेश जयस्वाल, योगेश वाजपेयी, वसंता भिसे, अहेमद खान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी