
रायगड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०५ वाजता कोंकण भवन इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
या निमित्ताने राष्ट्रध्वज वंदन तसेच संचलनाचा कार्यक्रम होणार असून, कोकण विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे. उपस्थितांनी राष्ट्रीय अथवा समारंभीय पोषाखात सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या किमान २० मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
समारंभाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कार्यक्रमस्थळी येताना कोणतीही बॅग किंवा अनावश्यक साहित्य सोबत आणू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोंकण भवन येथे होणाऱ्या या विभागीय कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीचा जागर करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)