
मुंबई, 14 ऑगस्ट (हिं.स.)। सन २०२३ च्या नव्या लोकायुक्त कायद्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील दोन न्यायिक सदस्यांचा तसेच दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी समारंभ आज लोकभवन मुंबई येथे संपन्न झाला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सर्व सदस्यांना पदाची शपथ दिली.
सर्वप्रथम राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांना महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या न्यायिक सदस्य पदाची शपथ दिली. त्यानंतर राज्यपालांनी निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा किशोर केवले यांना लोकायुक्त संस्थेच्या दुसऱ्या न्यायिक सदस्य पदाची शपथ दिली.
सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता आणि राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देखील यावेळी न्यायिक सदस्यांव्यतिरिक्त अन्य सदस्य म्हणून शपथ देण्यात आली.
सर्व सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करतील, यापैकी आधी घडेल त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.
शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी सर्व सदस्यांच्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील नियुक्तीची राज्यपालांची अधिसूचना वाचून दाखवली.
शपथ ग्रहण सोहळ्याची सुरुवात 'वंदे मातरम्', राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता वंदे मातरम् व राष्ट्रगीताने झाली.
राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी सर्व सदस्यांना त्यांच्या नियुक्तीची राज्यपालांची अधिसूचना प्रदान केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर