
परभणी, 14 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्य दिनानिमित्त ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवाजीनगर येथील जेथलिया हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. सौ. मीनल श्याम जेथलिया, एम.डी.एस. (मुखरोग चिकित्सा व क्ष-किरणशास्त्र) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात नागरिकांची दंतरोग तपासणी, निदान व आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना आवश्यक औषधे मोफत देण्यात येणार असून दंतरोगासंदर्भात तज्ज्ञांचा सल्लाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. वेडेवाकडे अथवा अनियमित दात असलेल्या रुग्णांसाठी ब्रेसेस बसविण्याची सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुक नागरिकांनी 02452-224892 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जेथलिया हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष येऊनही नावनोंदणी करता येणार आहे. परभणी शहरासह परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
आरोग्यसेवेत संस्थेचा सातत्यपूर्ण सहभाग...
‘आरोग्य सेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून कार्यरत असलेल्या ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतात. आरोग्यसेवा हा संस्थेच्या कार्याचा महत्त्वाचा भाग असून, दरवर्षी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत वैद्यकीय तपासणी, निदान आणि औषधोपचार शिबिरांचे आयोजन केले जाते. गरजू रुग्णांना औषधोपचार उपलब्ध व्हावेत तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता भासू नये, यासाठी संस्थेच्या वतीने आवश्यकतेनुसार मोफत औषधांचाही पुरवठा केला जातो. आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि गरजू नागरिकांना उपचारासाठी मदत उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून संस्था सातत्याने सामाजिक आरोग्यसेवेत योगदान देत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक गोविंद ब्रिजमोहनजी शर्मा तसेच सचिव पवन ब्रिजमोहनजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवाभावी उपक्रम सुरू आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis