लातूर - गोलाईने घेतला मोकळा श्वास; फळगाड्यांसाठी लोखंडी ग्रीलच्या मागे जागा निश्चित
लातूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरातील मध्यवर्ती आणि सतत वर्दळीचे ठिकाण असलेल्या गोलाई परिसरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणाच्या समस्येवर लातूर पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या उद्देश
अतिक्रमण


लातूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरातील मध्यवर्ती आणि सतत वर्दळीचे ठिकाण असलेल्या गोलाई परिसरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणाच्या समस्येवर लातूर पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखा, गांधी चौक पोलीस ठाणे आणि लातूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि प्रो. उपविभागीय पोलीस अधिकारी केंगले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान गोलाई परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या फळांच्या गाड्यांना लोखंडी ग्रीलच्या मागील निश्चित जागेत व्यवस्थित लावून घेण्यात आले. त्यामुळे मुख्य रस्त्याचा वाहतुकीसाठी असलेला भाग मोकळा झाला असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध झाली आहे.

फळविक्रेत्यांचा व्यवसाय बंद न करता नियोजन

गोलाई परिसरात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला अनियोजित पद्धतीने फळगाड्या उभ्या राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेकदा कोंडीची परिस्थिती निर्माण होत होती.

ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने फळविक्रेत्यांचा व्यवसाय बंद न करता त्यांच्यासाठी निश्चित जागेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे एकीकडे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून दुसरीकडे फळविक्रेत्यांच्या उपजीविकेचाही विचार करण्यात आला आहे.

पादचाऱ्यांना दिलासा

या कारवाईमुळे गोलाई परिसरातील रस्त्याची उपलब्ध जागा वाढली असून वाहनांचा प्रवाह अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना आणि परिसरातून ये-जा करताना होणारी गैरसोय कमी होण्याची शक्यता आहे.

लातूर शहराच्या वाहतुकीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या गोलाई परिसरात वाहतूक शिस्त कायम ठेवण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

लातूर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी पोलीस विभाग, महानगरपालिका आणि संबंधित घटकांच्या समन्वयातून यापुढेही आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेचा वापर करावा आणि रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संयुक्त कारवाईनंतर गोलाई परिसर अधिक मोकळा आणि शिस्तबद्ध दिसू लागला असून, “लातूरच्या गोलाईने घेतला मोकळा श्वास” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande