‘ करिअरसाठी 18 ते 25 वयोगट अत्यंत महत्त्वाचा’- सत्यम गांधी
अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस झालेल्या सत्यम गांधी यांनी आपल्या स्वानुभवातून तरुणांना करिअर आणि आयुष्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. करिअर घडविण्यासाठी १८ ते २५
IAS सत्यम गांधी: करिअरसाठी 18-25 वय महत्त्वाचे:मित्र निवडा, सोशल मीडिया टाळा; आयुष्याचे पैलू उलगडले


अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस झालेल्या सत्यम गांधी यांनी आपल्या स्वानुभवातून तरुणांना करिअर आणि आयुष्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. करिअर घडविण्यासाठी १८ ते २५ वर्षांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून, या काळात जिद्द, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मोठे यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले.

अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात गांधी यांनी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासातील विविध अनुभव कथन केले.

गांधी यांनी सांगितले की, वयाच्या १८व्या वर्षापर्यंत त्यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. सतत शिकण्याची जिद्द, आपल्या उद्दिष्टांप्रती सजगता आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा यामुळे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या गांधी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी पालघर येथे एसडीओ आणि प्रकल्प संचालक तसेच सांगली महापालिकेचे आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

शिक्षणासाठी कुटुंबावर झाले होते १५ लाखांचे कर्ज

आपल्या शैक्षणिक प्रवासासाठी कुटुंबावर सुमारे १५ लाख रुपयांचे कर्ज झाले होते, अशी आठवण गांधी यांनी सांगितली. आजोबा आणि वडिलांनी शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. मात्र, नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच हे कर्ज फेडून कुटुंबाला कर्जमुक्त केल्याचे त्यांनी नमूद केले.

गांधी यांच्या कुटुंबात अभियंता आणि डॉक्टर असले तरी त्यांच्या आजोबांची आपल्या घरातून एक आयएएस अधिकारी घडावा, अशी इच्छा होती. शालेय जीवनापासूनच आजोबा आपल्यात एका अधिकाऱ्याचा शोध घेत होते. पहिल्यांदा अधिकारी म्हणून सरकारी वाहनातून घरी गेलो, त्यावेळी आजोबांना झालेला आनंद अविस्मरणीय होता. आपल्या स्वागतासाठी अधिकारी आणि सुरक्षारक्षक पाहून त्यांच्या भावना अवर्णनीय झाल्या होत्या, असे गांधी यांनी सांगितले.

रील्सपेक्षा पुस्तके आणि वर्तमानपत्रांना वेळ द्या

तरुणांना मार्गदर्शन करताना गांधी यांनी इन्स्टाग्राम आणि रील्ससारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून शक्य तितके दूर राहण्याचा सल्ला दिला. विशेषतः १८ ते २५ वर्षांच्या तरुणांनी पुस्तके आणि वर्तमानपत्रांशी नाते जोडावे, असे आवाहन त्यांनी केले.

रात्री उशिरापर्यंत जागून वेळ वाया घालवण्याऐवजी वेळेत झोप घेणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी दिवसभराचा आढावा घेऊन आपल्या दिनक्रमातील टाळता येण्याजोग्या गोष्टी लिहून ठेवाव्यात आणि दुसऱ्या दिवशी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

आजोबांच्या आठवणीने भावूक

गांधी यांनी आपल्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंगही यावेळी सांगितला. ते आयएएस झाल्यानंतर त्यांच्या ९९ वर्षीय आजोबांनी ‘माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या’ असे म्हणत अन्नत्याग सुरू केला. १६ दिवसांनंतर त्यांचे निधन झाले. आजोबांना कोणताही आजार नव्हता; मात्र त्यांच्या शेवटच्या क्षणी आपण त्यांच्याजवळ उपस्थित नव्हतो, ही खंत आजही मनात असल्याचे गांधी यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande