परभणी : वनामकृविमध्ये प्रगत कीटकनाशक अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन
देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिकांवर परिसंवाद कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन परभणी, १४ ऑगस्ट (हिं.स.) : नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात (वनामकृवि) प्रगत की
परभणी : वनामकृविमध्ये प्रगत कीटकनाशक अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन


देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिकांवर परिसंवाद

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी, १४ ऑगस्ट (हिं.स.) : नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात (वनामकृवि) प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

भारत सरकारची राष्ट्रीय कृषि विकास योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, यावेळी ‘देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ या विषयावर परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहणार आहेत. वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री ना. ॲड. आशिष जयस्वाल तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. परभणीचे महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा आणि जिल्हा परिषद अध्यक्ष लता विजयकुमार वाकळे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, रामाराव वडकुते, लोकसभा सदस्य संजय जाधव, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, विक्रम काळे, सईद खान तसेच विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, बालाजी कल्याणकर, राजेश विटेकर आणि श्रीजया चव्हाण यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कृषि विभागाचे सचिव डॉ. परिमल सिंग, कृषि परिषदेचे महासंचालक राहुल रंजन महिवाल, कृषि आयुक्त सुरज मांढरे, कृषि प्रक्रिया नियोजन संचालक विनयकुमार आवटे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शेतमालातील अवशेष तपासणीला मिळणार वैज्ञानिक आधार

नव्या प्रयोगशाळेमुळे शेतमालामधील कीटकनाशक अवशेषांची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करणे शक्य होणार आहे. सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि अवशेषमुक्त कृषी उत्पादनांच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

परिसंवादात देशी गोवंशाचे संवर्धन, नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार, सेंद्रिय उत्पादन, मसाला पिकांचे उत्पादन आणि मूल्यवर्धन याबाबत शेतकरी, विद्यार्थी व संबंधित घटकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, परभणी आत्मा संचालक दौलत चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भास्कर कोळेकर (परभणी) आणि प्रदीप कच्छवे (हिंगोली) यांनी केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande