
खासदार बळवंत वानखडे यांचे आश्वासन
लोकसभेत मुद्दा उपस्थित करून केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही
अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालय परिसरात ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची १३ ऑगस्ट रोजी तात्पुरती सांगता करण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी खासदारांच्या हस्ते शरबत प्राशन करून आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
खासदार बळवंत वानखडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्यासोबतच लोकसभेत हा विषय उपस्थित करून प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आगामी अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून भारतरत्न पुरस्काराची घोषणा होईपर्यंत मागणीसाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
तिवसा येथे सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही वानखडे यांनी सांगितले. तसेच भारतरत्न पुरस्काराच्या मागणीसंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चेसाठी उपोषणकर्त्यांना बोलाविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार राजेश वानखडे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिवसा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा उल्लेख करून पत्र पाठविल्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
खासदार, आमदार, प्रशासन तसेच उपस्थित गुरुदेव भक्तांच्या विनंतीला मान देत उपोषणकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना शरबत पाजून अन्नत्याग आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आता केंद्र सरकारकडून या मागणीबाबत काय निर्णय घेतला जातो आणि लोकसभा तसेच केंद्र सरकारच्या पातळीवर याबाबत कितपत पाठपुरावा होतो, याकडे आंदोलनकर्ते आणि गुरुदेव भक्तांचे लक्ष लागले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी